नांदेड - मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले असून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना हदगावमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने काळे झेंडे दाखविण्यात आले. त्यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रदेशाध्यक्ष माधवराव देससरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी पाटील कऱ्हाळे, तालुकाध्यक्ष गजानन पाटील सोळंके, विश्वजित पाटील पवार, एम. जी. पाटील, पवनकुमार पाटील मोरे चंद्रकांत बेलखेडे देवा पाटील साई पाटील सूर्यवंशी यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. पालकमंत्री अशोक चव्हाण हे हदगाव येथे खाजगी कामानिमित्त आले होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यामागणीसाठी अशोक चव्हाण यांना हदगाव शहरतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काळे झेंडे दाखविण्यात आले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दडपशाही कराल तर याद राखा : देवसरकर
मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. एवढेच नाही तर उपसमितीचे अध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री हेही आरक्षण मिळवून देण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने संवैधानिकरित्या आंदोलन छेडण्यात आले आहे. जर कोणी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दडपशाही केली तर याद राखा, असा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर यांनी दिला आहे.