नांदेड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात येत असून जनतेने संचारबंदीच्या काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही घराबाहेर निघू नये. मराठी नववर्षाचा आज पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्यानिमित्त सहकार्याची गुढी उभारून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग देशभर पसरला असून राज्यातही १०० हून अधिक कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. सुदैवाने नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला, तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेडमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २१ दिवस चालणाऱ्या संचारबंदीमध्ये कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. या काळात आपण घरातच राहावे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या कळात सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक मगर यांनी केले.
भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना करतो. आरोग्यमय जीवनाची इच्छा ईश्वरापुढे व्यक्त करत असतो. त्यानुसार भारतावर आणि जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण प्रार्थनेची गुढी उभारुया. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्याची गुढी उभारुन कोरोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन विजयकुमार मगर यांनी केले आहे.