नांदेड - शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल 3 एकर ऊस जळून खाक होऊन ४ लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी देळूब बु. (ता.अर्धापूर) शिवारात ही घटना घडली. नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या घटनेमुळे अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणींचाही फटका बसत आहे. या घटनेप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक घटनेची नोंद करण्यात आली आहे.
अर्धापूर तालुक्यातील देळूब बु. शिवारात प्रशांत माधवराव बनसोडे यांचे शेत आहे. त्यांनी या शेतात यंदा 3 एकर ऊस लावला होता. हा ऊस तोडणीस आला आहे. मात्र, शेतातून गेलेल्या विद्युत तारेचा सोमवारी सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने आगीची ठिणगी उसात पडली. त्यामुळे उसाच्या फडाला आग लागली. या आगीत 3 एकर ऊस जळून गेल्याने शेतकऱ्याचे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले. घटनेबाबत तहसील कार्यालय अर्धापूर, विज वितरण कंपनी कार्यालय आणि पोलीस ठाणे अर्धापूर येथे माहिती देण्यात आली आहे. विविध नैसर्गिक संकटातून वाचलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा - कांदा आयातीचा निर्णय देशातील शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी
याचबरोबर शेतातून गेलेल्या विद्युत तारा अनेक ठिकाणी लोंबकळल्या आहेत. अशा तारांमुळे ठिणगी पडून उसासह अन्य पिके जळण्याच्या घटना झाल्या आहेत. तसेच जीवितहानीच्या घटना झाल्या आहेत. म्हणून या तारांची दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलिन करणार - जयंत पाटील