नांदेड : खोटे कागदपत्र दाखवून नगरपालिका स्वीकृत सदस्य पद भूषवणाऱ्या नगरसेवकांना न्यायालयाने दणका दिला आहे. कंधार नगरपालिकेचे स्वीकृत सदस्य कृष्णा पापीनवार आणि बाबुराव केंद्रे यांनी खोटे कागदपत्र दाखल करून नगरसेवक पद भूषवले आहे. या प्रकरणात कंधार न्यायालयाने दोघांना सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
नगरसेवक शहाजी नळगे यांची कोर्टात धाव-
कंधार नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळेस खोटे कागदपत्र दाखल केले म्हणून माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार आणि संस्थापक बाबुराव केंद्रे यांच्या विरोधात नगरसेवक शहाजी नळगे यांनी कंधार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी (दि.२७ मे) न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ल. मु. सय्यद यांनी दिला असून दोन्ही आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
२०१६ मध्ये कंधार नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती, तेव्हा शहाजी नळगे व कृष्णा पापीनवार एकमेकाविरूद्ध निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत कृष्णा पापीनवार यांचा पराभव झाला तेव्हा कृष्णा पापीनवार यांना नगर परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून प्रवेश मिळावा, या हेतुने सेनेचे गटनेते दिपक आवाळे यांनी त्यांचे नाव स्वीकृत सदस्य पदासाठी सूचविले होते. परंतु सदर पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण केली नसल्यामुळे कृष्णा पापीनवार यांचा अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांनी फेटाळला होता.
स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज करताना कृष्णा पापीनवार हे कोणत्याही संस्थेचे पदाधिकारी नव्हते. त्यांनी बाबुराव केंद्रे यांच्या संस्थेचे बनावट प्रमाणपत्र जोडले होते. या प्रकरणाची तक्रार शहाजी नळगे यांनी कंधार पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षकांकडे केली होती. परंतु, राजकीय दबावापोटी त्यांनी कृष्णा पापीनवार व बाबुराव केंद्रे विरुद्ध कोणतीही कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे शहाजी नळगे यांनी कंधार न्यायालयात २०१७ साली तक्रार दाखल केली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कंधार पोलीस ठाण्याला दिले होते. त्याचा निकाल २७ मे २०२१ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला. तक्रारीतील आरोपी कृष्णा पापीनवार व बाबुराव केंद्रे यांना कलम ४२० खाली २ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ल.मु. सय्यद् यांनी ठोठावली. शहाजी नळगे यांची बाजू अॅड. कोळनूरकर, अॅड. मारोती पंढरे आणि अभय देशपांडे यांनी मांडली. कंधार न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे.