नांदेड - जिल्हा माहिती कार्यालयातील सेवा निवृत्त कर्मचारी बालनरसय्या अंगली यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अंगली यांनी तब्बल 30 वर्ष या विभागात आपली सेवा बजावली, ते 30 एप्रिलला सेवा निवृत्त झाले.
शासनाच्या चित्रपट शाखेच्या माध्यमातून योजनांची माहिती गावोगावी
सुमारे 33 वर्षांपुर्वीचा काळ, त्या काळात आजच्या एवढी प्रगत माध्यमे नव्हती, शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागात खेड्या-पाड्यात पोहचावी यासाठी तेंव्हाच्या प्रसिध्दी खात्यात असलेल्या चित्रपट शाखेद्वारे शासकीय योजना व एखाद्या चित्रपटाची रिल सोबत घेवून गावो-गाव हे लघुपट दाखवले जायचे. नांदेड जिल्ह्यात ही जबाबदारी अंगली यांनी पार पाडली. त्यावेळी रात्री उशिर झाल्यामुळे अंगली यांचा मुक्काम हा ज्या-त्या गावातच ठरलेला. नांदेड जिल्ह्यातील अशी एकही वेस नसेल की जेथे आपली सेवा बजावण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील बालनरसय्या अंगली हे गेले नसतील.
वृत्तपत्रांच्या प्रत्येक कचेरीत बातमी पोहोचविण्याची होती जबाबदारी-
चित्रपट शाखेच्या कामाबरोबर शासकीय दौऱ्याच्या बातम्या देताना फोटो आवश्यक असे, मात्र त्या काळी तात्काळ वितरणासाठी कार्यालयातच एक फोटो धुण्याची लॅब (डार्करुम) असायची. बालनरसय्याचे काम हे छायाचित्र अधिकाधिक चांगले यावे याची खबरदारी घेणे व सहाय्य करणे. हे फोटो पाण्यात भिजून डेव्हलप केल्यानंतर त्याला ऊन पावसापासून वाचवत अर्थात भिजू न देता वृत्तपत्रांच्या प्रत्येक कचेरीत बातमी वेळेत पोहचविणे हे होते. ही जबाबदारी देखील त्या काळी बालनरसय्या अंगली यांनी कोणाचीही तक्रार न येवू देता पार पाडली.
30 वर्षाच्या आठवणी-
कोरोनाच्या या काळात समारंभ न करता सहज त्यांना बोलते केले. 30 वर्षाचा काळ आणि या काळातील आलेले अनेक आव्हाने सांगता-सांगता ते भावूक झाले. ज्या जागेवर बसून आजवर जी सेवा बजावली त्या जागेकडे पाहत-पाहत ते बोलते झाले. ‘साहेब आजवर नांदेडचे हे असले ऊन खुप अंगावर घेतले. पाऊसही खुप अंगावर घेतला. असंख्य वेळी मी ओला झालो पण बातमीला आजवर वादळ वाऱ्यात भिजू न देता ती प्रेसच्या हवाली केली,असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 'बातमीलाही पावित्र्य असते, बातमी ही निष्कलंक असते हे सुत्रच जणू त्यांनी पुढे ठेवले.