नांदेड - रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चित्र रथ आणि डिजिटल डिस्प्ले व्हॅनचा प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रथाला सुरुवात करण्यात आली. रस्ता सुरक्षेच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर हा रथ धावणार आहे.
रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती
रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंर्तगत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबीर, नेत्र तपासणी शिबिर यासारखे अनेक उपक्रम राबवले आहे. या अभियानातून नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे.
डिजिटल डिस्प्ले व्हॅन आणि चित्ररथाला सुरुवात
जिल्ह्यातील रस्त्यावरील अपघात कमी झाले पाहिजेत, वाहन चालकाला वाहतुकीचे नियम समजले पाहिजे यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सातत्याने जनजागृती करत आहे. यासाठी डिजिटल व्हॅन आणि चित्र रथाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी शिक्षण राज्यमंत्री डी. पी सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक अधिकारी अविनाश राऊत यांची उपस्तीती होती. वाढते अपघात रोखण्यासाठी संदेश देणारे विविध फलक या चित्र रथात लावण्यात आले आहे. चित्र रथाच्या माध्यमातून लोकांमध्ये रस्ते सुरक्षा जण जागृती झाली पाहिजे हा उदेश आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली. जिल्ह्यातील सोळा तालुक्यात जाऊन हा रथ वाहतूक नियमावलीचा संदेश देणार आहे.
अपघात कमी करण्यासाठी मोहिमेला पाठबळ द्यावे
रस्ता सुरक्षा अभियानात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अनेक उपक्रम राबवले गेले आहेत. रात्रीच्या वेळी अपघात रोखण्यासाठी साखर कारखाना येथील बैलागडीला परावर्तक लावून वाहतुकीचे नियम सांगण्यात आले. त्यासोबतच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, पथनाट्य, माहिती पत्रकांचे वाटप, विशेष वाहन तपासणी मोहीम, बॅनर आणि पोस्टर लावणे, रिक्षाचालकांना मार्गदर्शन, शाळेतील मुख्यध्यपकांना मार्गदर्शन यासारखे भरगच्च कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अभियानाला नागरिकांनी पाठबळ द्यावे आणि अपघात कमी करण्यास सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.