नांदेड - सरकारी रुग्णालयात सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. बाह्यरुग्ण तपासणीला दुपारनंतर सुरुवात होतेय, त्यामुळे रुग्णांना सकाळपासून ताटकळत बसावे लागत आहे.
रुग्णांना औषधे बाहेरूनच खरेदी करण्यास सांगण्यात येत आहेत. तर, सिटीस्कॅन, सोनोग्राफीसह अनेक मशीन बंदच असल्याने गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीने बहुतांश खासगी रुग्णालये बंद असल्याने रुग्णांना नाईलाजाने सरकारी रुग्णालयात यावे लागत आहे.
मात्र, इथं येणाऱ्या रुग्णांची हेळसांडच केली जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी रुग्णालयाला येऊनही त्याचा काहीही फायदा गोरगरीब रुग्णांना होताना दिसत नाहीये. कहर म्हणजे सरकारी रुग्णालयातील अनेक डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. तर, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर हे प्रभारी पदावर असल्याने त्यांना कुणी जुमानत नाही. या सगळ्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.