नांदेड - आता खुल्या शेतीला भविष्य राहिलेले नाही. आच्छादित शेती शिवाय काहीही शिल्लक राहण्याची शक्यता नाही. आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत हे निश्चित आहे. पृथ्वीवरचे तापमान व हवेतील कार्बन वाढल्याने कितीतरी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पीक विमा जेवढा मजबूत करता येईल तेवढा मजबूत केला पाहिजे व हवेतील कार्बन कमी करणारी पिके घेऊन पिकांमध्ये बदल करावा लागणार आहे, अशा अपेक्षा आहेत, अशी प्रतिक्रिया राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पर्यावरणपूरक पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासची गरज
ते म्हणाले, केंद्राच्या क्रीडा नावाच्या संस्थेने एक अहवाल दिला आहे की, 2030 पर्यंत दुधाचे उत्पन्न हे चाळीस टक्क्यांवर येईल. तर पावसाचे प्रमाण कमी व तापमानात वाढ यामुळे अनेक पिकेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे पटेल म्हणाले.
पर्यावरणपूरक वस्तू निर्माण करण्यावर भर द्यावे
सरकारने पेट्रोल, डिझेल, कोळसा जाळण्यावर तसेच प्लास्टिकवर बंदी आणणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक वस्तू निर्माण करण्यावर भर द्यावे. तसेच वातावरणात जास्तीत जास्त ऑक्सिजन कशाप्रकारे असेल, याबाबत केंद्र सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही पाशा पटेल म्हणाले.
हेही वाचा - 'शिवा' इथून पुढे भाजप, शिवसेनेला पाठिंबा देणार नाही - मनोहर धोंडे