नांदेड - जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे फळ बागांचे मोठे नुकसान झाले. दाभड या गावातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पपईची ऊभी बाग पावसामुळे नासून गेली. यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या बागेवर चक्क नांगर फिरविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा... राज्यपाल कोश्यारींची सत्ता स्थापनेसाठी भाजपला विचारणा
दाभड येथील गजानन टेकाळे या शेतकऱ्यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत मागील वर्षी तायवान ७८६ जातीच्या पपईची लागवड केली. लागवडीसाठी मशागत, रासायनिक व शेंद्रीय खते, औषधी आणि रोप खरेदीसाठी अंदाजे दिड ते दोन लाख रुपये खर्च केला. मागील वर्षी मोठी पाणी टंचाई असताना छोट्या - छोट्या रोपट्याला टँकरद्वारे पाणी देवून ही पपईची बाग कशीबशी जगविली. त्यानंतर यावर्षी पपईच्या प्रत्येक झाडाला मोठ्या प्रमाणात फळधारणा झाली. त्यावर महागड्या औषधाची फवारणी केली. त्यामुळे टवटवीत आणि मोठमोठी फळे लागली. यावर्षी तसा बाजार भावही चांगला असल्यामूळे पपई पिकातून मोठे उत्पन्न मिळेल ,असे स्वप्न उराशी बाळगून शेतकरी समाधानी होता. अशातच अर्धापूर तालुक्यात परतीचा प्रचंड पाऊस बरसला. या अतिपावसामुळे गजानन टेकाळे यांच्या शेतातील दोन एकर पपईच्या बागेवर विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि झाडाला लागलेली फळे नासून, गळून पडायला लागली. त्यावर अनेक प्रकारचे उपाय करूनही फळांची गळ थांबली नाही. तर झाडाला लागलेली पपई झाडावरच नासून जाऊ लागली आहे. शेवटी हतबल झालेल्या या शेतकऱ्यानी शेतातील पपईच्या उभ्या बागेवर टॅक्टरचा नांगर फिरविला.
हेही वाचा... 'शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे, आम्ही विरोधात बसण्याची वाट बघतोय'
टेकाळे यांचे दिड ते दोन लाख रुपयांची नुकसान झाली असून एकही रूपयांचे उत्पन्न मिळाले नाही. उलट नष्ट केलेली बाग दुरूस्त व मशागत करण्यासाठी अजून खर्च करावा लागणार आहे. अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप हंगामातील पिकासह बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे.