नांदेड- भोकर रस्त्यावरील येळेगाव पाटीजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना कारने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी झालेल्या या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ब्रह्माजी बाबाराव कपाटे असे मृताचे नाव आहे. तर होणाजी मुंजाजी कपाटे हे जखमी आहेत.
ब्रह्माजी बाबाराव कपाटे व होनाजी मुंजाजी कपाटे हे दोघे नांदेड-भोकर रस्त्यावर येळेगाव पाटी जवळ रस्त्याच्या बाजूला दुचाकी (क्र.एम.एच २६ एम ४२२) थांबवून उभे होते. त्याचवेळी रस्त्यावरून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. ए.पी.०९ ए.एम.१३१२) या दोघांनाही उडवले. यात दोघेही गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी ब्रह्माजी बाबाराव कपाटे वय ४२ (राहणार येळेगाव ता.अर्धापूर) हे मृत असल्याचे सांगितले.
या अपघाताची माहिती कपाटे यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. तसेच पोलिसांनी या अपघात प्रकरणाचा पंचनामा आणि पुढील कार्यवाही करून ब्रह्माजी कपाटे यांचा मृतदेह नातेवाईंकाच्या स्वाधीन केला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता येळेगाव येथे शोकाकुल वातावरणात ब्रम्हाजी कपाटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.