नांदेड- जिल्ह्यातील हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा २०२० या वर्षीचा खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाचा विमा इफ्को (टोकीयो) विमा कंपनीने नामंजुर केला. कंपनीच्या निषेधार्थ शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगांव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. आंदोलनावेळी पावसाला सुरुवात झाली असतानाही शेतकऱ्यांनी भरपावसात आपले आंदोलन सुरूच ठेवले.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात विमा नाही
विशेष म्हणजे पालकमंञ्याच्या मतदारसंघात भोकर तालुक्यात सोयाबीनकरिता पीक विमा मंजुर केला. परंतू हदगाव व हिमायतनगरकरिता पीक विमा का मंजुर नाही? असा प्रश्न शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी आंदोलनाच्या वेळी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांविषयी भेदभाव करणाऱ्या पीकविमा कंपनीच्या विरोधात तहसील कार्यालय हदगाव समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील असंख्य शेतकरी भर पावसात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
तीव्र आंदोलनाचा इशारा
लोकनेते बाबुराव कदम म्हणाले, आठ दिवसात पीकविमा कंपनीने पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास, आम्ही सर्व शेतकरी वर्ग तीव्र जनआंदोलन करु, असा इशारा बाबुराव कदम यांनी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तसेच तालुका कृषी अधिकारी आर.डी. रणवीर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी विवेक देशमुख, गोपाल सारडा, विजय वळसे पाटील, बाबूराव कदम, बाळासाहेब कदम यांच्यासह हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी तसचे शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा- स्वाभिमानीकडून आगळवेगळ आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न