नांदेड OBC vs Maratha Reservation : राज्यात ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माहूर इथं सभा घेतल्यानंतर ओबीसी आणि मराठा आंदोलकांचा राडा झाला. मनोज जरांगे यांची सभा झाल्यानंतर ओबीसी आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर मराठा आंदोलकांनी दुग्धाभिषेक करत सभास्थळी घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या माहूरमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
- मनोज जरांगेंच्या सभेपूर्वी दाखवले काळे झेंडे : माहूरगड इथं मनोज जरांगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेच्या अगोदर ओबीसी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सतर्कता बाळगत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सभा संपल्यानंतर या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आलं. त्यामुळे माहूरमध्ये तणाव निर्माण झाला होता.
सभा झाल्यानंतर ओबीसी आंदोलकांनी शिंपडलं गोमूत्र : मनोज जरांगे यांच्या सभास्थळी ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक आमने- सामने आल्यानं शहरात तणाव आहे. मनोज जरांगे यांची सभा संपल्यानंतर पोलिसांनी ओबीसी आंदोलकांना सोडून दिलं. मात्र त्यांनी सभास्थळी धाव घेत गोमूत्र शिंपडलं. त्यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने- सामने आले. या कार्यकर्त्यांनी सभास्थळावर जोरदार घोषणाबाजी केली.
मराठा आंदोलकांनी केला दुग्धाभिषेक : ओबीसी आंदोलकांनी मनोज जरांगे यांची सभा संपल्यानंतर तिथं गोमूत्र शिंपडल्याचं लक्षात येताच, मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी सभास्थळावर जात तिथं दुग्धाभिषेक केला. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं परिस्थिती तणावपूर्ण झाली. मात्र पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला असून सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :