नांदेड - जिल्ह्यात यंदा प्रकल्पात असलेला उपयुक्त पाणीसाठा तसेच, जमिनीतील ओलावा यामुळे रब्बी पेरणी ९१ टक्क्यांवर पोहचली आहे. यात हरभऱ्याची तब्बल एक लाख चार हजार ६३४ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
दोन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी
जिल्ह्यात प्रशासनाने यंदा अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे खरीपातील नुकसान भरून निघावे, यासाठी रब्बी पिकाखालील क्षेत्र वाढविण्यासाठी बैठका घेऊन नियोजन केले आहे. जिल्ह्यात हरभरा पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र ६१ हजार हेक्टर आहे. परंतु यंदा दोन लाख हेक्टरवर हरभरा पेरला जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा - इचलकरंजीचा वस्त्रोद्योग धोक्यात, बांगलादेशमार्गे 'चीन'चे कापड बाजारात!!
करडईचेही क्षेत्र वाढण्याचा अंदाज
यंदा करडईचेही क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख २८ हजार ८०६ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक हरभरा एक लाख चार हजार ६३४ हेक्टरनुसार ४२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर, रब्बी ज्वारी १४ हजार ३९६ हेक्टर, गहू पाच हजार ४५५ हेक्टर, मका एक हजार १३७ हेक्टर, करडई दोन हजार १६७ हेक्टर या प्रमाणे पेरणी झाली आहे. सध्या पाटबंधारे विभागाने पाणीपाळ्या देण्याचे नियोजन केले आहे. यामुळे आगामी काळात गव्हाची पेरणी वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा - बिहार निवडणूक आणि दिवाळीनंतर बांधकाम परप्रांतीय मजूर राज्यात परतण्यास सुरुवात