नांदेड - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माहुरचे गटविकास अधिकारी तोटवाड यांच्यासह राज्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे २० वरिष्ठ अधिकारी तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कुंभमेळ्याला जात आहेत. या दौऱ्यात ते उत्तर प्रदेश येथील कुंभमेळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या भविकांकरता पुरविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक सुविधांचा तसेच सनियंत्रणाचा अभ्यास करणार आहेत. या दौऱ्यासाठी विशेष बाब म्हणून विमानाने जाण्याची परवानगी शासनाने दिली आहे.
कुंभमेळ्यात उत्तरप्रदेश सरकारने भाविकांसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठीचे मनुष्यबळ, इतर विभागांशी केलेला समन्वय, आर्थिक तरतूद, प्रचार-प्रसिद्धी, क्षमता बांधणीसह स्वच्छता विषयक सुविधांचा अभ्यास करण्यासाठी ३ ते ५ मार्च दरम्यान ३ दिवसांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी नांदेड जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, कोल्हापूर, नंदुरबार, अकोला आदी ठिकाणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
२० जणांच्या या पथकात माहुरसह पंढरपूर, शेगाव, त्र्यंबकेश्वर, राहता आदी ठिकाणच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्हा परिषेदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. धारणी येथील उपविभागीय अधिकारी तसेच पालघर जिल्ह्यातील सहायक जिल्हाधिकारीही या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. या अधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा, तसेच तेथील नियोजनाचा अभ्यास करून त्याच पद्धतीने त्यांच्या तीर्थक्षेत्र ठिकाणी सुधारणा करणे अपेक्षित आहे.