नांदेड - पतीच्या त्रासाला कंटाळून सत्तरवर्षीय वृध्देने कोर्टात पोटगीसाठी दावा दाखल केला. पतीने तक्रारदार वृध्द पत्नीला दरमहा एक हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश न्यायलयाने दिला आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून नांदेडच्या न्यायालयाने पोटगी मंजूर करण्याचा निर्णय दिला.
मौजे एकदरा येथील इंद्राबाई यांचे लग्न ५५ वर्षापूर्वी नारायणराव आरसूळे यांच्यासोबत झाले होते. इंद्राबाई यांना पतीपासून तीन मुली आणि एक मुलगा आहे. नारायणरावांना दुसरे लग्न करायचे असल्याने त्यांनी इंद्राबाईला फारकत देण्यासाठी त्रस्त केले. त्यांना मारहाण करून काही वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले होते. त्यामुळे ७० वर्षीय तक्रारदार इंद्राबाई यांनी नांदेड न्यायालयात पोटगी मिळावी म्हणून प्रकरण दाखल केले.
हेही वाचा - वडिलांचे निधन होऊनही कर्तव्य तत्परता, कर्मचाऱ्याचे वित्त मंत्रालयाने केले कौतुक
नारायणराव हे सध्या ७५ वर्षांचे आहेत. त्यांना कमाईसाठी कामधंदा करता येत नाही. त्यामुळे इंद्राबाईंचा पोटगीचा अर्ज फेटाळून लावावा, असा युक्तिवाद नारायणराव यांच्या वकिलांनी केला. पोटगी कलम १२७ अंतर्गत पतीचे वय जास्त झाले, म्हणून पोटगी फेटाळता येत नाही. पतीने पत्नीचे पालन-पोषण करणे हे नैतिक कर्तव्य आहे, असा युक्तिवाद इंद्राबाई यांच्या वकील मंगल पाटील यांनी केला.
इंद्राबाई यांच्या बाजूचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अर्जदार इंद्राबाईंना पती नारायणराव यांनी दरमहा एक हजार रुपये पोटगी आणि एक हजार ७०० रुपये दाव्याच्या खर्चापोटी द्यावे, असा आदेश दिला.