नांदेड - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. देशातील महिला असुरक्षित आहेत. उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचार वाढत आहेत. हाथरस घटनेतील आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केली. नांदेडमधील अर्धकपुरात जिल्हा काँग्रेसच्यावतीने सोमवारी धरणे आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. तसेच मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी राजूरकर बोलत होते.
उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील एका मुलीवर झालेल्या अमानुष आत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने 'देशव्यापी' धरणे आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनास अर्धापूर शहरांत खुप मोठा प्रतिसाद मिळाला. आंदोलनात काँग्रेसच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील आमदारांनी सहभाग घेऊन धरणे आंदोलन केले. तसेच तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून हाथरस घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यात आला. शहरातील प्रज्ञा बौद्ध विहारात पीडित मुलीला श्रध्दांजली अर्पण करून मौन धारण करण्यात आले.
यानंतर प्रज्ञा बौद्ध विहारापासून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बसस्थानक परिसर, बसवेश्वर चौकामार्गे तहसील कार्यालयाच्या परिसरात जाऊन सांगता करण्यात आली.
दरम्यान, मोर्चात आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा परिषद आध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, रेखाताई चव्हाण, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
काय आहे हाथरस प्रकरण -
उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला होता. यानंतर एका या तरुणीला उपचारासाठी दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गेल्या आठवड्यात मंगळवारी या तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह तिच्या घरच्यांची परवानगी न घेता जाळून टाकला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर अनेक स्तरांतून टिका होत आहे.