नांदेड - सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यंत्रणा प्रमुख तसेच त्यांच्या अधिन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासोबतच निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले.
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीची आढावा बैठक विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, नांदेड परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, मनपा आयुक्त लहुराज माळी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, आदि विविध विभागाच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. नांदेड लगतच्या तेलंगणा व कर्नाटक राज्यातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांची संयुक्तपणे बैठक घेऊन (एसएसटी) स्थिर पथकाच्या कामाचाही आयुक्त केंद्रेकर यांनी आढावा घेतला. या बैठकीस निजामाबाद, आदिलाबाद, निर्मल व बीदर येथील अधिकारी यांचीही उपस्थिती होती.
ही निवडणूक मतदारांना अत्याधुनिक सुविधा घेऊन येत आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी याबाबत सखोल माहिती घेऊन निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी दिल्या. तसेच आदर्श आचार संहिता सर्व मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करुन निवडणूक निर्भय व शांततापूर्ण वातावरणात सर्वांनी समन्वय ठेवून पार पाडावी, असेही केंद्रेकर यांनी सांगितले.