नांदेड- जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामामध्ये पेरणी क्षेत्रात वाढ अपेक्षित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. धरणातील पाणीसाठ्याची चांगली स्थिती पाहता कृषी विभागाकडून ३ लाख हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक दोन लाख हेक्टरवर हरभरा, ४१ हजार हेक्टरवर गहू, तर ४० हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीचा पेरा प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील रब्बी हंगामाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र १ लाख ३६ हजार हेक्टर आहे. यात मागील काही वर्षांपासून वाढ होत आहे.
हेही वाचा-अमुल करणार मिठाई अन् खाद्य तेलाची निर्मिती
धरणातील पाणीसाठा तसेच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर प्रकल्पातून पाणी पाळ्या मिळत आहेत. त्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे. मागील वर्षी रब्बी हंगामात २ लाख ७५ हजार ६४६ हेक्टरवर पेरणी झाली होती. १ लाख ९० हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. तर, ४० हजार हेक्टरवर गहू व ३४ हजार हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली होती.
रब्बी हंगामात ३ लाख हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात २ लाख हेक्टरवर हरभरा, ४१ हजार ६६६ हेक्टरवर गहू, ४० हजार हेक्टरवर रब्बी ज्वारी, ५ हजार २५० हेक्टरवर मका, ३ हजार हेक्टरवर करडईची पेरणी प्रस्तावित आहे. शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात येणार आहे. खरिप हंगामामधील खतांचा साठा थोड्या प्रमाणात असल्याने खतांची कमी जाणवणार नाही,अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.