नांदेड - जिल्ह्यातील व शहरातील पहिला रुग्ण पीरबुऱ्हाण नगरमध्ये सापडला असून रुग्णाची स्थिती गंभीर आहे. हा रुग्ण नेमका कुणाच्या संपर्कामुळे संक्रमित झाला याचा शोध अद्यापही लागला नसून प्रशासकीय यंत्रणा संभ्रमात आहे. गुरुवारी पाठवलेल्या ६६ अहवालापैकी ५७ अहवालही निगेटिव्ह आले आहेत. तसेच संबंधित रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईकाचाही अहवाल निगेटिव्ह आला असून जिल्ह्यातील परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे. मात्र, संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण कुठून झाली? याचा शोध घेणे प्रशासनासमोर एक आव्हानच आहे.
संबंधित एका रुग्णानंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्याची परिस्थिती दिलासादायक आहे. मात्र, पिरबुऱ्हाण नगरमधील हा रुग्ण नेमका कुणाच्या संपर्कात आला. याचा मात्र अजूनही थांगपत्ता लागला नाही. तसेच जवळपास ३० ते ४० नातेवाईकांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्या रुग्णाला कोणापासून लागण झाली? हे शोधणे प्रशासनासमोर एक आव्हानच होऊन बसले आहे. सध्या नागरिकांनी घरीच राहून तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 683 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 222 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 89 नागरिक आहेत. यापैकी रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये 70 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 613 अशी संख्या आहे. शुक्रवारी तपासणीसाठी 66 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकूण 449 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 378 जण निगेटिव्ह आले असून 9 जणांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 77 हजार 676 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती नांदेडच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.