नांदेड - मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला राज्य सरकार पाठीशी घालत आहे. अंडरवर्ल्डच्या मदतीने अत्यंत महागडी जमीन कवडीमोल भावाने सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांना मिळाली. त्यामुळे नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील असलेले आर्थिक व्यवहार पुढे आलेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर केलेली कारवाई योग्य आहे, अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MP Prataprao Patil Chikhalikar) यांनी दिली आहे.
राजकारणाचा स्तर अजून किती हीन पातळीवर घेऊन जाणार?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची संपूर्ण माहिती केंद्रीय तपास यंत्रणेला दिली होती. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. ही अटक नियमानुसारच केली असून केंद्रीय तपास यंत्रणेवर संशय घेणाऱ्या महाविकास आघाडीतील नेते आणि राज्य सरकार नवाब मलिक यांना पाठीशी घालून कुठला संदेश देवू पाहत आहेत? असा प्रश्न करून राजकारणाचा स्तर अजून किती हीन पातळीवर घेऊन जाणार? असा सवाल खासदार चिखलीकर यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील बॉम्ब स्फोट टेरर फंडिंगच्या पैशातून झाले का?
देशाचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम रियल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय हे व्यवहार मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि हसीना पारकर याचा सहकारी सरदार पटेल यांच्याकडून सॉलीडस नावाच्या कंपनीला महागडी जमीन अत्यंत कवडीमोल भावात विकली. ही कंपनी मंत्री नवाब मलिक यांच्या नातेवाईकानी विकली. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना टाडा लागू झाल्याने या कायद्यानुसार गुन्हेगाराची सगळी मालमत्ता जप्त होते. ही मालमत्ता जत होऊ नये यासाठीच सदरील जमिनीचा व्यवहार करण्यात आला. या व्यवहारानंतर मुंबईत तीन वेळा बॉम्ब स्फोट झाले, हे बॉम्ब स्फोट टेरर फंडिंगच्या पैशातून झाले का? असा प्रश्न उपस्थित करून खासदार चिखलीकर म्हणाले की, देशाच्या सुरक्षेच्या बाबतीतसुद्धा काहीजण राजकारण करतात हे किळसवाणे आहे, असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.