नांदेड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अडचणीत सापडलेल्या गरजवंतांना मदत करण्याची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गरजूंना मदत करण्यासाठी सर्व भाजप कार्यकर्ते 'ग्राऊंडलेवल'वर काम करीत असल्याचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या उपाययोजनांचा खासदार चिखलीकर यांनी गुरुवारी भोकर येथे अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यावेळी बोलताना चिखलीकर म्हणाले की, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, घरात थांबून सुरक्षित राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत कोणीही उपाशी राहू नये अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठांनी घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात असलेल्या स्थानिक आणि परराज्यातून कामासाठी आलेल्या प्रत्येकांना मदत करण्यासाठी मी वेळोवेळी माहिती घेऊन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अन्नधान्याचे वाटप सरू झाले आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशांची माहिती घेऊन त्यांना मदत करावी, असे मी भाजप कार्यकर्ते आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
यावेळी आरोग्य विभाग आणि महसूल विभागाकडून उपलब्ध धान्याच्या साठवणुकीची माहिती घेतली. सध्या दुर्लक्षित असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी माहिती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. परराज्यातून शहरात कामासाठी आलेल्या अनेक कामगारांना चिखलीकर यांनी अन्नधान्याचे तर पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटाईझरचे वाटप केले.
शहरातील शासकीय रुग्णालयास भेट देवून आयसोलेशन विभागाची पाहणी करून सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पो. नि. विकास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, दिलीप सोनटक्के, गणेश पा. कापसे, शिवाजी पा. किन्हाळकर, बाळा साकळकर, हरीभाऊ चटलावार, गणपत पिटेवाड, संतोष मारकवार, आनंद डांगे, बाळू माने, शिवा जाधव, माधव शिंदे, दिनेश लक्षटवार, माऊली पाटील, चंद्रकांत नागमोड, भगवान दंडवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थित होते.
सामाजिक संघटनांचे खासदार चिखलीकरांकडून कौतुक
लॉकडाऊन काळात शासनाकडून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत असले तरी अशा परिस्थितीत परराज्यातून आलेले शहरालगत पाली टाकून थांबलेल्या दुर्लक्षित कुटुंबांना मदत करण्याची भूमिका दिलीप सोनटक्के, प्रा. व्यंकटराव माने, राजू देशपांडे यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. तीनशेपेक्षा अधिक कुटुंबांची मागील पंधरा दिवसांपासून दररोज दोन वेळेस जेवणाची व्यवस्था करणाऱ्या कार्यकर्त्यांचे चिखलीकर यांनी कौतुक केले.