नांदेड - कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी २२ मार्चला केंद्र सरकारच्यावतीने 'जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील जनतेनेही कर्फ्यू पाळून सहकार्य करावे असे, आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले.
कोरोना विषाणूने जगात थैमान घातले असून आजवर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात या रोगाचा प्रसार वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार अनेक उपाययोजना करत आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी देशातील जनतेला २२ मार्चला कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील जनतेने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवशी स्वयंस्फूर्तपणे कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा, असेही खासदार पाटील म्हणाले.
हेही वाचा - कोरोना व्हाईट हाऊसमध्ये दाखल, उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्याला बाधा
कोरोना प्रतिबंधासाठी जनतेने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, हस्तांदोलन टाळावे. या बाबी गांभीर्याने पाळल्यास रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध बसेल असे पाटील म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धरे ठाकरे आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र्रात परिस्थिती नियंत्रणात आहे. सरकारने येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि कार्यक्रम बंद केले आहेत. या सरकारला जनतेने आजवर पाठिंबा दिला असून पुढेही असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.