नांदेड - राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व रस्ते दुरुस्तीची ही जबाबदारी माझी नाही. मी राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असून ते महामर्ग रस्ते दुरुस्तीचे काम केंद्राचे असून त्यांनीच हे महाकाम करावे, असे म्हणत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ते जिल्ह्यातील अर्धापूर शहर व तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
अर्धापूर शहरातील नगरपंचायत पाणी पुरवठा योजना, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, वाचनालय, सिमेंट नाली-रस्ते यासह विविध विकासकामांची शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) पाहणी करुन, कामाचा आढावा घेतला व अधिकाऱ्यांना मुदतीत मजबूत व पारदर्शक कामे करण्याचे आदेश या बैठकीत दिल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.
केंद्र व राज्याच्या वादात खड्डे जैसे थे
मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रसरकारकडे बोट दाखवून संबंधित विभागाला सूचित करू, असे म्हटले असले तरी चाचले असते. महामार्गवारील खड्ड्यामुळे अनेक अपघात आणि मृत्यू होत आहेत. केंद्र आणि राज्याच्या जबाबदारी नाट्याच्या राजकारणात खड्डे मात्र जैसे थेच आहेत. निष्पाप बळी जात आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी नसली तरी जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या पालकमंत्र्याने जबाबदारी झटकल्यामुळे नेमकी दाद कुणाकडे मागावी ? अशी कुजबुजही ऐकायला मिळाली.
हेही वाचा - नांदेड : अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा; शेतकरी कायद्यावरून केंद्राचा निषेध