नांदेड - वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर एमआयएम पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या तीन उमेदवारांची यादी जाहीर केली. नांदेड उत्तरमधून जिल्हाध्यक्ष फेरोज लाला यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीने अद्याप एमआयएमच्या युती तोडल्याच्या निर्णयाला अधिकृत मान्यता दिलेली नाही. तरीही एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तीयाज जलील यांनी नांदेड उत्तरसह वडगाव शेरी ( पुणे ) आणि मालेगाव सेंट्रल या मतदारसंघासाठीचे उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
पुणे शहरातील वडगाव ( शेरी ) विधानसभा मतदारसंघात डॅनिअल रमेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात आली. तर मालेगाव सेंट्रल मतदारसंघासाठी मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील यांना उमेदवारी दिली गेली.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये कुत्र्याने चावा घेतलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू
एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही इम्तीयाज यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचे सांगितले. यामुळे जलील यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचा राजकीय जोड सक्षम पर्याय म्हणून समोर आला होता. या आघाडीमुळे अनेक मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बर उमेदवारांची बिघाडी झाली होती.
वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडल्याची घोषणा एमआयएमने केली आहे. त्यामुळे एमआायएमने वंचित आघाडीला एकतर्फी 'तलाक' दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.