नांदेड - हिमायतनगर येथील एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बालाजी मल्हारी देवकते (वय ४३) असे या आरोपीचे नाव आहे.
हिमायतनगर येथील दोन अल्पवयीन मुली १६ मार्च २०१९ ला घरासमोर खेळत होत्या. आरोपी बालाजी देवकते याने एका अल्पवयीन मुलीला खड्डयात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलींचा शोध घेतला असता पीडित मुलगी घराच्या दिशेने रडत येत होती. तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
हेही वाचा - धक्कादायक...! नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचा खून
पीडित अल्पवयीन मुलीच्या सांगण्यावरून आरोपी विरूद्ध हिमायतनगर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक डी.एस. काळे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. सादर केलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे जिल्हा सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांनी आरोपी बालाजी देवकते याला आजीवन जन्मठेप आणि दहा हजार रूपये दंड ठोठावला. अॅड. रमेश राजूरकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.