नांदेड - जिल्ह्यातील १६ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवड करण्यात आली. यामध्ये काँग्रेसला 8 जागी सभापती आणि 8 जागी उपसभापतिपद, भाजपला 6 जागी सभापती आणि 5 जागी उपसभापतिपद, तर शिवसेनेला एका ठिकाणी सभापती आणि दोन ठिकाणी उपसभापतिपद मिळाले. तर धर्माबादची निवडणूक हाणामारी आणि गोंधळामुळे लांबणीवर पडली.
हेही वाचा - धर्माबाद पंचायत समितीमध्ये सभापती, उपसभापती निवडीवरून राडा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्या-जिल्ह्यात 'महाविकास आघाडीचा पॅटर्न' राबविण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातही हा पॅटर्न राबविण्यात आला असला तरी त्यातही शेवटपर्यंत रस्सीखेच पाहायला मिळाली. अर्धापूरला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. याठिकाणी काँग्रेसचा सभापती, तर सेनेचा उपसभापती झाला. हदगावलाही महाआघाडीचा प्रयोग झाला असून सभापती शिवसेना, तर उपसभापतिपद काँग्रेसला मिळाले. माहूरला काँग्रेसचा सभापती, तर शिवसेनेचा उपसभापती झाला. कंधारला दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. त्यामुळे सभापतिपद आणि उपसभापतिपद चिठ्ठीने ठरवण्यात आले. त्यात सभापती काँग्रेसचा, तर उपसभापती भाजपचा झाला.
हेही वाचा - नांदेडच्या पत्रकार भवनसाठी लागेल ती मदत करण्याची तयारी - खासदार चिखलीकर
बिलोलीत भाजपला स्पष्ट बहुमत असूनही पक्षांतर्गत गटबाजीमुळे सभापती पद भाजपला, तर उपसभापती पद काँग्रेसला मिळाले. नायगावलाही अशीच परिस्थिती झाली. त्यात भाजपचा सभापती, तर उपसभापती पद काँग्रेसला मिळाले. किनवट, मुखेड, लोहा आणि उमरी या चार ठिकाणी भाजपचेच सभापती, उपसभापती झाले. खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी लोहा, आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुखेडला, तर माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी उमरीत वर्चस्व राखले. नांदेड, हिमायतनगर, भोकर, देगलूर आणि मुदखेड या पाच ठिकाणी काँग्रेसचेच सभापती, उपसभापती झाले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर, मुदखेड आणि अर्धापूरला, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी नांदेडला, आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलूरला, तर आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी हदगाववर आपले वर्चस्व राखले.
नवनियुक्त सभापती उपसभापती
नांदेड -
सभापती - कावेरी वाघमारे (काँग्रेस)
उपसभापती - अॅड. राजू हटकर (काँग्रेस)
माहूर-
सभापती - निलाबाई राठोड (काँग्रेस)
उपसभापती -उमेश जाधव (शिवसेना)
किनवट-
सभापती - हिराबाई आडे (भाजप),
उपसभापती - कपिल करेवाड (भाजप)
हदगाव-
सभापती - महादाबाई तम्मलवाड (शिवसेना)
उपसभापती - शंकर मेंडके (काँग्रेस)
हिमायतनगर-
सभापती - सुरेखा आडे (काँग्रेस)
उपसभापती - शशीकला कौठेकर (काँग्रेस)
भोकर-
सभापती - नीता रावलोड (काँग्रेस)
उपसभापती - नागोराव कोकुळे (काँग्रेस )
अर्धापूर-
सभापती - कांताबाई सावंत ( काँग्रेस )
उपसभापती - अशोक कपाटे ( शिवसेना )
मुदखेड-
सभापती - बालाजी सूर्यतळे (काँग्रेस)
उपसभापती - आनंदा गादिलवाड (काँग्रेस)
बिलोली-
सभापती - सुंदरबाई पाटील (भाजप),
उपसभापती - शंकर यंकम (काँग्रेस)
देगलूर-
सभापती - संजय वलकल्ले (काँग्रेस),
उपसभापती - ज्योती चिंतलवार ( काँग्रेस )
मुखेड-
सभापती - सविता पाटील (भाजप) ,
उपसभापती - हरिबाई गोड (भाजप)
लोहा-
सभापती - आनंद शिंदे पाटील (भाजप),
उपसभापती - नरेंद्र गायकवाड (भाजप)
कंधार-
सभापती - लक्ष्मीबाई घोरबांड (काँग्रेस) ,
उपसभापती - लता वडजे (भाजप)
नायगाव-
सभापती - प्रभावती कत्ते (भाजप),
उपसभापती - संजय पाटील शेळगावकर ( काँग्रेस )
उमरी-
सभापती - सावित्रीबाई सोनकांबळे (भाजप),
उपसभापती - शिरीष गोरठेकर (भाजप)
धर्माबाद -
निवडणूक लांबणीवर