नांदेड - किनवट येथे लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांचा घसा गेल्या दीड महिन्यापासून कोरडा पडला आहे. राज्यात दारू विक्री बंद असल्याने अनेक ठिकाणी दारूचे दुकाने फोडल्याचे किंवा अवैध दारू विक्री करताना कारवाई झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याला जरब बसावा यासाठी आता स्थानिक तरुणांचे पथक तयार करून ते अशा दारू अड्ड्यांवर वॉच ठेवणार आहे.
लॉकडाऊनला तब्बल दीड महिना लोटला असून, नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू निर्माण केली जात असल्याने पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग अनेक वेळा आशा दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणी कारवाई करत आहेत.
सुमारे सोळा तालुके असलेल्या नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला घटनास्थळी जाऊन कारवाई करणे शक्य नाही. किनवट व माहूर हे आदिवासी बहुल तालुके असल्याने हा परिसर मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग दाट झाडीने वेढलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्टी दारू निर्मिती केली जाते.
यावर आळा बसावा यासाठी आता राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभागातर्फे किनवट माहूर तालुक्यातील काही गावामध्ये स्थानिक तरुणांचे एक पथक तयार करून गावामध्ये गस्त घालत आहेत. गावामध्ये अवैधरित्या तयार होणारी हातभट्टी दारू, यावर रात्रंदिवस करडी नजर या तरुणांची असून या तरुणांच्या पथकाने आतापर्यंत निराळा तांडा, मोहन नाईक तांडा, दहेली, या गावात पाच ते सहा हातभट्टी निर्मिती करणारे अड्डे उध्वस्त केले आहेत. यापुढे ही या तरुणांचे पथक सक्रिय राहणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.