नांदेड : Khalistani Shelter in Nanded : भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानवादी दहशतवाद्यावरुन वाद (India Canada Row) सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशभरातील 43 गँगस्टरची यादी जाहीर केलीये. भारत आणि कॅनडा देशातील तणावाचा फायदा घेऊन त्यातील काहीजण नांदेडला आश्रयाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं नांदेड पोलिसांनी दक्षतेचा इशारा (Nanded Police Alert) दिला असून, संशयित व्यक्तीच्या हालचाली कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. 'एनआयए'नं देशातील 43 गँगस्टरची फोटोंसह यादी प्रसिद्ध केली आहे. त्यातील काहीजण नांदेडला येऊन राहिले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळं सर्व यंत्रणेला दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.
दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा होता नांदेडात : दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा हा नांदेडात अनेक वर्ष वास्तव्यास होता. त्यानं याठिकाणी खंडणीसाठी अनेकांना धमकावलं होतं. काही जणांवर गोळीबारही केला. व्यावसायिक बियाणीच्या हत्येचा मुख्य सूत्रधारही रिंदाच असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. सीमेपलीकडून रिंदाच्या सहकाऱ्यांनी देशात शस्त्रं आणली होती. रिंदाचे अनेक साथीदार आजही नांदेडात आहेत. तर दुसरीकडं पंजाबमध्ये गंभीर गुन्हे करणारे आरोपी नांदेडात आश्रय घेतात. पंजाबमध्ये गुन्हे केल्यानंतर अनेक कुख्यात आरोपींनी नांदेडला आश्रय घेतल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं पोलिसांच्या या इशाऱ्याचं विशेष महत्व आहे. खलिस्तानी दहशतवादी निज्जरची कॅनडात हत्या झाल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानं दोन देशातील संबंध बिघडले आहेत.
संशयित म्हणून जाहीर केलेले हे गँगस्टर जिल्ह्यात व शहरात आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉज, ढाबे, यात्री निवास, डेरे, सराय, आश्रमशाळा तसेच भाडेकरुसाठी खासगी निवासस्थानं पुरवणाऱ्या ठिकाणी आपली खरी ओळख लपवून ते राहू शकतात. त्यासाठी अनोळखी व्यक्तीची ओळख पटवूनच त्यांना आश्रय द्यावा, तसेच संशयास्पद काही आढळल्यास याची माहिती पोलिसांना लगेच द्यावी - श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड
'एनआयए'नं आवळला कारवाईचा फास : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशातील अनेक राज्यात खलिस्तानी समर्थकांवर कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केलीये. त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. तसेच त्यांची हिटलिस्ट ही तयार करण्यात आलीये. त्याचबरोबर कुख्यात गँगस्टर असलेल्या 43 जणांची यादीही 'एनआयए'नं जाहीर केली आहे. हे सर्व गँगस्टर सध्या फरार आहेत. त्यांच्यावर 'एनआयए'नं बक्षीसही जाहीर केलं आहे. हे आरोपी देशातील कोणत्याही राज्यात, शहरात आश्रय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे नांदेड शहर : नांदेड हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. याठिकाणी देश-विदेशातील भाविक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळं संशयित म्हणून जाहीर केलेले हे गँगस्टर जिल्ह्यात व शहरात आश्रय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉज, ढाबे, यात्री निवास, डेरे, सराय, आश्रमशाळा तसेच भाडेकरुसाठी खासगी निवासस्थानं पुरवणाऱ्या ठिकाणी आपली खरी ओळख लपवून ते राहू शकतात. त्यासाठी अनोळखी व्यक्तीची ओळख पटवूनच त्यांना आश्रय द्यावा, तसेच लॉज व हॉटेल चालकांनी त्यांच्या राहण्याबाबतच्या सर्व नोंदी रजिस्टरला ओळखपत्रासह घेऊन अद्ययावत ठेवावी. त्याची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी, असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केलं आहे.
हेही वाचा :