नांदेड : जिल्ह्यातील दाभड (ता.अर्धापूर) येथील शेतकरी आपल्या दुचाकीवर काम आटपून घराकडे परतत होते. नांदेड- नागपूर राष्ट्रीय महामार्गवर ( Nanded Nagpur National Highway ) सत्यगणपती मंदिरा समोर रस्ता वाहनाने लेव्हल करण्याचे काम रात्रीला सुरू होते. या वाहनाने चिरडल्यामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू ( Farmer Crushed By Road Leveling Vehicle ) झाला. गजानन श्रीराम पावडे (वय-३५) असे मयत शेतकऱ्याचे नाव ( Farmer Died In Road Accident ) आहे.
हळद काढणीच्या कामावर गेले होते : नांदेड नागपूर-राष्ट्रीयमहामार्ग क्र.३६१ चे काम सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी रस्ता लेव्हल करण्याचे काम रात्रीला सुरू आहे. दरम्यान तालुक्यातील दाभड येथील युवा शेतकरी गजानन श्रीराम पावडे (वय-३५) यांचे शेतात हळद काढणी व शिजवणीचे काम सुरू होते. बुधवारी रात्री उशिरा शेतातून घराकडे परतत असताना सत्यगणपती मंदिरासमोर त्यांना लेव्हल करणाऱ्या वाहनाने चिरडले. महामार्ग पोलिसांनी एका खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पाठीमागे आहे मोठा परिवार : त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. दाभड (ता.अर्धापूर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव, उपनिरीक्षक कपिल आगलावे, महामार्गचे प्रभारी शंकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर तिडके, सुमित बनसोडे, प्रभाकर करडेवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली.