नांदेड - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मात्र, तरीही परराज्यातील मजुरांच्या हाताने मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरूच आहे. नांदेडजवळच्या बोढार गावाजवळ गोदावरी पात्रात शेकडो मजुरांद्वारे रेतीची चोरी करण्यात येत आहे. रेतीचा उपसा करण्यासाठी परराज्यातून चोरट्या मार्गाने मजूर आणले आहेत. या सर्व मजुरांना एकाच जागी कोंबड्यांप्रमाणे ठेवलेले आहे. यातील एखाद्याला कोरोनाची लागण असेल तर गावातदेखील कोरोनाचा फैलाव होईल, अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी गावकऱ्यांनी तक्रार करूनही त्याचा काहीही फायदा झालेला नाही. महसूल प्रशासन केवळ रेती चोरी करणारे तराफे जाळण्याचा दिखावा निर्माण करण्यापलीकडे काहीही करत नाही. त्यातून दिवसाढवळ्या गोदावरी पात्रातून प्रचंड प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे, तर या मजुरांमार्फत कोरोनाचा फैलाव होईल या भीतीने गावकरी प्रचंड धास्तावले आहेत. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.