नांदेड - यंदाचा दमदार पाऊस, सिंचन प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा तसेच जमिनीतील ओलाव्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात हरभरा पेरणीकडे वळले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत ५० हजार ७४२ हेक्टरनुसार ३६.१९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात हरभऱ्याची ४१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
नांदेडमध्ये रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार... नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न २ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षितकृषी विभागाने रब्बीसाठी लागणारे बियाणे तसेच खताचे नियोजन केले आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी रब्बी पिकाखालील क्षेत्र या वर्षी वाढवण्याचे नियोजन केले होते. जिल्ह्यात हरभरा पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र ६१ हजार हेक्टर आहे. परंतु यंदा दोन लाख हेक्टरवर हरभरा पेरला जाईल, असे नियोजन केले असल्याची माहिती कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी दिली.
आतापर्यंत ३६.०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी
कृषी विभागाकडून हरभरा, करडी तसेच ज्वारीच्या पिकांचे अनुदानित बियाणे वाटप करण्यात आले आहे. प्रमाणित बियाणेही शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ५० हजार ७४२ हेक्टरनुसार ३६.१९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे . यात सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची झाली असून ४१ हजार हेक्टरवर ही पेरणी झाल्याची माहिती कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी दिली.
पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर)
हरभरा : 41 हजार 251
गहू : 1 हजार 748
ज्वारी : 6 हजार 69
रब्बी मका : 329
करडई : 884
सूर्यफूल : 21
एकूण : 50 हजार 742 हेक्टर