नांदेड : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात आरोग्य, पोलीस, महसूल, शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने अत्यावश्यक सेवा म्हणून राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँक कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे आणि आजही ते आपली सेवा बजवात आहेत. त्यामुळे त्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
प्रशासनाच्या बरोबरीने बँक कर्मचाऱ्यांचीही सेवा..
देशात गतवर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने सर्व व्यवस्था कोलमडून पडली असताना आणि सगळीकडे लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सर्व सरकारी यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाली होती त्यामध्ये आरोग्य, पोलीस, महसूल, शिक्षण विभाग यांच्या बरोबरीने सर्वच राष्ट्रीयकृत आणि सहकारी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी सुद्धा अत्यावश्यक सुविधा म्हणून आपली सेवा त्याच ताकदीने बजावली होती आणि आजही ते आपली सेवा बजावत आहेत त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
सेवा लक्ष्यात घेऊन लस द्यावी..
सलग सहा महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार सुरळीत राहावेत म्हणून सर्वच बँक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा दिली आहे. तर काही वेळा सुरक्षा किटचा वापर करत ग्राहकांना घरपोच सेवा दिली व अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शासनाने बँक कर्मचाऱ्यांची ही अविरत सेवा लक्षात घेऊन लस उपलब्ध करून द्यावी, असेही राजश्री पाटील म्हणाल्या.