नांदेड - धर्माबाद नगरपरिषदेतील कर अधीक्षक व सफाई कामगाराने संगनमत करून तब्बल १० लाख ५८ हजार ४९ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वार्षिक लेखापरीक्षण अहवालानंतर हा अपहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. कर अधीक्षक पठाण अफजलखान नवाजखान व सफाई कामगार मनोज हरीसिंग टाक अशी त्यांची नावे आहेत.
अधीक्षक पठाण आणि सफाई कामगार टाक यांनी संगनमत करून १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत नगरपरिषदेचे जागाभाडे, इमारत भाडे व सेवाशुल्क नागरिकांकडून वसुल केले. ही रक्कम १० लाख ५८ हजार ४९ रुपये एवढी होती. परंतु ही रक्कम त्यांनी शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची तसदी घेतली नाही. उलट या रकमेचा अपहार करीत मौजमजा केली. दरम्यान, मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी लेखापरीक्षण करून घेतले असता, हा अपहार केल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी मंगेश देवरे यांनी सुरुवातीला कर अधीक्षक पठाण अफजलखान व सफाई कामगार मंगेश टाक यांना नोटीस देऊन सदर रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. परंतु ही रक्कम तत्कालीन कर अधीक्षक पठाण अफजलखान यांनी हडप करून सफाई कामगार मनोज टाक यांच्यावर आरोप करीत होता. त्यामुळे मनोज टाक यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा पालिकेतील कर्मचारी करीत आहेत.
मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक रूकमाजी भोगावार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्कालीन करअधीक्षक पठाण अफजलखान नवाजखान व सफाई कामगार मनोज हरीसिंग टाक यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरकंडे करीत आहेत.