नांदेड- चार दिवसाच्या नकोशीला रस्त्याच्या कडेला फेकत मातेने पोबारा केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हिमायतनगर तालुक्यातील घारापूर ते विरसनी मार्गावर हा प्रकार उघडकीस आला आहे. बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून सुजाण नागरिकांनी या मुलीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
रस्त्याच्या कडेला नाल्याजवळ दिले फेकून
शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास घारापूर ते विरसनी मार्गावर काही नागरिकांना बाळाचा आवाज ऐकू आला. त्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याजवळ एका पिशवीत बाळ रडत असल्याचे निदर्शनास आले. या मुलीला हिमायतनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर मुलीचे पालकांचा शोध घेणे सुरू आहे.
सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाला जीवदान
हिमायतनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदिनवार हे आपल्या मित्रासह कामानिमित्त माध्यमार्गाने जवळगावकडे दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. मौजे घारापुर - विरसनी येथील नदीकडीर रस्त्यावर अचानक चिमुकल्या बालकाचा रडण्याचा आवाज आला. यावेळी त्यांनी दुचाकी उभी करून आजूबाजूला पाहणी केली असता, नाल्याच्या कडेला एका पिशवीत ४ दिवसाचे बाळ आढळून आले. त्यांनी लगेच त्या चिमुकल्या बालिकेस घेऊन हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय गाठले आणि तिचा जीव वाचवला व घटनेची माहिती पोलिसांना दिली. ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी श्री नाईक यांनी चिमुकल्या बालिकेची तपासणी केली असता ती सुदृढ असल्याचे सांगितले. तसेच तिच्याबद्दल जोपर्यंत तपास लागत नाही, तोपर्यंत तिला नांदेड येथील शिशुगृहात पाठविली असल्याचेही सांगितले.
पालकांचा शोध सुरू
हिमायतनगर तालुक्यात सध्या पावसामुळे नदी नाले खळखळून वाहत आहेत. अशा परिस्थितीत ४ दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका नवजात बालिकेस फेकून दिल्याची घटना घडल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ते बाळ जन्माला आल्यानंतर मारून टाकण्याच्या उद्देशाने फेकून दिले असावे काय?, हे बाळ अनैतिक संबंधातून जन्मलेले असावे काय?, कुमारी मातेचे बाळ असावे? अन्यथा कुमारी मातेचा अवैध गर्भपात केला गेला असावा? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणी हिमायतनगरचे पोलिस तपास करीत असून, याबाबत पोलीस डायरीत पंचनाम्यानंतर नोंदणी घेतली जाणार आहे. आता या बाळाच्या आईचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. हे बाळ का फेकण्यात आले? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. एकीकडे 'बेटी बचाव, बेटी पढाव' असा नारा देऊन शासन जनजागृती करत असताना आज उघडकीस आलेली हि घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून बालिकेच्या माता - पित्याचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रामदास रामदिनवार यांनी केली आहे.