नांदेड - धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथे शेतकऱ्याने उन्हाळी ज्वारी पेरणीसाठी 'ईनानी फर्टिलायझर्स'कडून बियाणे विकत घेतले. मात्र, जवळपास काढणीचा कालावधी येऊनही या बियाण्यास ज्वारी लागली नसल्याने शेतकऱ्यांनी दुकान चालकास जाब विचारला. मात्र दुकानदाराने उडवा उडवीची उत्तरे दिली. उद्धटपणाची वागणूक दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने थेट ज्वारीच्या काही पिकाची धाट कापून दुकानात आणली. यानंतर देखील बियाणे विक्रेत्याने शेतकऱ्याला सहकार्य न केल्याने अखेर त्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार केली.
संबंधित तक्रारीनंतर धर्माबाद तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत यांनी इनानी फर्टिलायझर्स येथे जाऊन पाहणी केली. या प्रकरणात चौकशी समिती तयार करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्ती काळातही शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना यामध्ये जिल्हाधिकारी व जिल्हाकृषी अधिकारी यांनी लक्ष देऊन बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.