नांदेड - जगात केवळ 350 पीपीएम कार्बन उत्सर्जन पचविण्याचीच क्षमता वातावरणात आहे. ती पातळी वातावरण बदलाने ओलांडली आहे. ही देशासाठी नव्हे तर जगासाठी धोक्याची घंटा आहे. यातून वाचायचे असेल तर कार्बनडाय ऑक्साईड खाणारे ज्याची साल जाड व बुड मोठी आहे अशाच वृक्षांची लागवड करावी लागेल. हाच एकमेव पर्याय आहे, असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी व्यक्त केले.
नांदेड येथील गोदावरी तिरावर वसलेल्या मौजे वासरी या गावास कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले, जगात 225 राष्ट्र आहेत. त्यापैकी सर्वात जास्त कारखानदारी असणारे देश म्हणजे चीन व अमेरिका. जगाच्या एकूण प्रदूषणाच्या तुलनेत चीनमध्ये 27 टक्के कार्बन प्रदूषण तर अमेरिकेत 16 टक्के कार्बन प्रदूषण आहे. हे मी सांगत नाही तर जागतिक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्फत जाहीर झालेली आकडेवारी सांगते. असा दाखला देत कोरोनामुळे जगात सर्वात जास्त मृत्यूदर देखील चीन, अमेरीकेचाच आहे, असे पटेल म्हणाले.
याचे कारण त्या देशातील वाढलेल्या कार्बन उत्सर्जनाने तेथील स्थानिक लोकांची रोग प्रतिकारशक्ती क्षीण असणे होय. हे सर्वात मोठे कारण आहे असे सांगताना त्यांनी जगातील कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाची आकडेवारी दिली. ते म्हणाले, जगात मागच्या वर्षी 280 पीपीएम कार्बन उत्सर्जन होत होते. ते सद्या 422 पीपीएमवर पोहचले आहे. जगाच्या तुलनेत 350 पीपीएम कार्बन उत्सर्जन पचविण्याचीच क्षमता वातावरणात आहे. ती पातळी वातावरण बदलाने ओलांडली आहे. ही देशासाठी नव्हे तर जगासाठी धोक्याची घंटा आहे. यातून वाचायचे असेल तर कार्बन डाय ऑक्साईड खाणारे ज्याची साल जाड व बुड मोठी आहे. अशीच वृक्ष लागवड करावी लागेल हाच एकमेव पर्याय आहे.
हिंदू धर्मात तुळस, वड, पिंपळ, उंबर या झाडांना देवाचा दर्जा दिला आहे. ते देवत्व मानव प्राण्यांनी संपविले आहे. त्यावर तोडगा हा मनुष्य जातीलाच काढावा लागेल. वातावरण बदलाचा अमुलाग्र बदल लक्षात घेऊन शासनाने वड, पिंपळ यासारखी वृक्ष लावण्याबाबत उपाययोजना करावी. ही वृक्ष वाढण्यासाठी वेळ लागतो. तो पर्यंत विनाश अटळ आहे. त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी जगाच्या व्यासपीठावर तापमान रोधक वनस्पती म्हणून बांबूस मान्यता देण्यात आली आहे. जो बांबू, वड, पिंपळ या झाडांच्या तुलनेत कमी दिवसात अधिक जोमाने वाढतो व दोन्हींपेक्षा अधिक म्हणजे 30 टक्के कार्बन फस्त करतो व वातावरणातील तापमानावर नियंत्रण ठेवतो. 'बांबू'स झाड या व्याख्येतून वगळण्याचा कायदा करुन बांबू या वनस्पतीस गवताच्या व्याख्येत समाविष्ट केले आहे असे त्यांनी सांगितले.
या मागची मोदींची भुमिका म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. मृद व जल संधारणाच्या मार्फत पर्यावरणाचे संतुलन रक्षण होऊन देशहित राखल्या जाईल हिच शुद्ध भावना आहे. चीन-अमेरिका आजघडीला जात्यात आहेत तर, आपण सुपात आहोत. 27 नक्षत्राचा बदल दोन नक्षत्रात झाला आहे. एक म्हणजे ढगफुटी तर दुसरी म्हणजे दुष्काळ. या दुष्ट चक्रातून वाचायचे असेल तर लाखो लीटर पाणि वाया घालून तयार होणारी शेती बदलली पाहिजे त्यासाठी बांबू शेतीकडे वळा. कारण प्लास्टिक बंदीला पर्यावरणपुरक पर्याय हा बांबूच आहे.
भविष्यात ताट, वाटी, प्लेट, ब्रश, कंगवा, घर, इथेनॉल, डिझेल, पेट्रोल, अल्कोहोल अशा अनेक जीवनाच्या दैनंदिन उपयोग व काळाची ओळख बांबूपासून तयार होणार आहे. अटल बांबू तंत्र शिक्षण महाविद्यायाच्या माध्यमातून अनेक अभियंते तयार करुन बांबू लागवड ते काढनीपर्यंत लक्ष देण्याचे अभिवचन देऊन, भीती वाटत असेल तर सुरुवातीला पडिक जमिनीवर, बांधावर बांबू लागवड करुन देशाच्या शाश्वत जडणघडणीत सहभाग नोंदवा, असे त्यांनी आवाहन केले. यावेळी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, भाजप नेते प्रवीण गायकवाड, माजी सरपंच सुदाम पाटिल खनसोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शंकर मुतकलवाड, लक्ष्मण कांजाळकर, माधव पाटील येडे आदी उपस्थित होते.