नांदेड - जिल्ह्यात सर्रासपणे चुकीच्या पद्धतीने होणारे सोयाबीन पीक कापणी झाले आहेत. जिल्ह्यात प्रत्यक्ष शिवारात पीक कापणी प्रयोगाच्या अनेक चुका निदर्शनास आल्या आहेत. कुठेही सोयाबीनचे ओलावा मोजण्यासाठी मोईसचर मीटर नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाच्या उद्देशाला हरताळ फासल्या जात आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी नागोराव भांगे यांनी घेतलेला आढावा...
प्रत्यक्ष मोईसचर मीटरने मोजणी
अनेक ठिकाणी प्रत्यक्षात मोईसचर मीटर आणून मोजले असता 12 ते 25 पर्यंतचे मोईसचर निघाले. त्यामुळे प्रत्यक्ष मोईसचर पीक कापणी प्रयोग गृहीत धरण्यात आले नाही. तसेच काडी कचरा व डागेल सोयाबीन सुद्धा साफ करण्यात आले नाही. त्यामुळे काढण्यात आलेली सोयाबीनची उत्पादकता पूर्णपणे चुकीची आहे. दरम्यान, यावेळी विमा कंपनीच्या प्रतिनीधीशी चर्चा केली असता त्यांनी मी फक्त बाय विटनेस एवढाच असल्याचे सांगितले.
कृषी विभागाची विमा कंपनीच्या सोयीचे भूमिका
जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीचे पाणी शेता शिवाराने एक किंवा दोन दिवसांपर्यंत मुक्काम ठोकून होते. अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन काही ठिकाणी वाहून गेले तर कुठे पाण्याने सडले. परंतु , त्याकडे कृषी विभाग आणि विमा कंपनी फिरकली सुद्धा नाही. सोयाबीनचा उतारा पहावयाचा असेल तर अशा भागात पिक कापणी प्रयोग करून आणेवारी काढण्याची गरज आहे. पण तसे होताना दिसून येत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. कृषी विभागाने विमा कंपनीला सोयीचे होईल, अशी भूमिका घेऊन आणेवारी काढल्यास त्याचे गंभीर परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यासंबंधी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांचे कडे तक्रारी केल्यानंतरही सुद्धा चुकीच्या च पध्दतीने पीक कापणी प्रयोग करण्यात येत आहेत.
पीक कापणी प्रयोगाच्या उद्देशाला हरताळ
आजच्या परिस्थितीत अतिवृष्टी मुळे 15 ते 25 च्या दरम्यान मोईसचर असताना, मोबाईल अॅपमध्ये शून्य मोईसचर टाकणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाच्या उद्देशाला हरताळ फासले जात आहे. हे केवळ एका मंडळ किंवा जिल्ह्यापुरता विषय नसून अशाच पद्धतीने पीक कापणी प्रयोग होत असतात. याकडे कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांचे चुकीच्या पद्धतीने निघणारे उत्पादन थांबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.