नांदेड - कंधार तालुक्यात गेल्या काही दिवसात दमदार पाऊस झाला. त्यामुळे सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असून काही ठिकाणी खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील अनेक गावात पेरणीला सुरुवात झाली असून मागील तीन- चार दिवसांपासून पेरणीच्या कामांना वेग आला आहे. आत्तापर्यंत तालुक्यात 78 मीमी पावसाची नोंद झाली. शेतजमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याने शेतकऱयांनी पेरणीला सुरुवात केली. साधारणतः तीस ते पस्तीस टक्के क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात साठ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
मागील हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. गुलाबी बोंड अळी, अतिवृष्टी व त्यानंतर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीचा फेरा अशा संकटाची मालिका कापसाच्या नशिबी आली होती. मात्र, तरीही यंदाच्या हंगामात शेतकऱयांनी कापूस लागवडीला प्राधान्य दिले आहे. कापसासह, सोयाबीन, ज्वारी व आंतरपीक म्हणून तूर, मूग, उडीद, कारळ, तीळ इत्यादी पिकांची लागवड होताना दिसत आहे.
दरम्याने येत्या काही तासात मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, अशी माहिती कुलाबा प्रादेशिक हवामान विभागाचे दिली आहे.