नांदेड - गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ते डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्षपर्यंतचे पक्षनिष्ठेचे फळ डॉ. अजित गोपछडे यांना मिळाले. जिल्ह्यातील लिंगायत समाजाची संख्या बऱ्यापैकी असून भारतीय जनता पक्षाने डॉ. गोपछडे यांच्या माध्यमातून लिंगायत समाजाचा ओबीसी चेहरा दिला आहे.
जिल्ह्यात भाजपचे विधानसभेतील तीन आमदार, एक विधानपरिषद आमदार आणि एक खासदार आहेत. पुन्हा एकदा जिल्ह्याला विधानपरिषदेच्या निमित्ताने आमदार दिल्यामुळे बळ मिळणार आहे. बिलोली तालुक्यातील कोल्हे बोरगाव येथील डॉ. अजित गोपछडे मूळ रहिवासी असून वडील प्रा. माधवराव गोपछडे प्राध्यापक होते. शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा असलेल्या डॉ. गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई जिल्हा बीड येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात घेतले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरू करून वैद्यकीय सेवेत उतरले. त्यांच्या पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेड सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरू करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रत्येक कामात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. गोपछडे यांच्यावर सध्या प्रदेशवरील भाजपच्या डॉक्टर सेलची जबाबदारी असून भाजपच्या डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करत आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालक पदीही त्यांची नियुक्ती आहे.
नांदेडला भाजपचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर आहेत तर जिल्ह्यात भाजपचे राजेश पवार (नायगाव), डॉ. तुषार राठोड (मुखेड), भीमराव केराम (किनवट) हे तीन आमदार आहेत. त्याचबरोबर गतवर्षीच विधानपरिषदेवर भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम पाटील-रातोळीकर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे चार आमदार आणि एक खासदार असलेल्या नांदेड जिल्ह्यात आता डॉ. गोपछडे यांच्या माध्यमातून आणखी एका आमदाराची भर पडणार आहे.
नांदेड जिल्ह्याची काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा गड म्हणून राज्यस्तरावर ओळख आहे. भाजपने विधानपरिषदेवर गतवर्षी एक मराठा चेहरा दिला, त्यानंतर आता लिंगायत चेहरा देऊन काँग्रेसला शह देण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. यास भविष्यात किती यश मिळेल हे काळच ठरवणार आहे.