नांदेड- भारतात अनेक पद्धतीने दिवाळीची सुरुवात होते. मात्र, महाराष्ट्रात वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असते. ग्रामीण भागात शेतकरी गाय आणि वासरांचे पूजन करून वसूबारस साजरी करतात. गाय ही कृष्ण स्वरूपात प्रभूंचे प्रतिनिधित्व करते, अशी श्रद्धा असल्याने वसूबारसला महत्व आहे. 'दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी' असे म्हणत आजपासून दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. 'वसूबारस' हा गाई व गोधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्सद्वादशीस 'वसूबारस' साजरी केली जाते. यावेळी गायीची वासरासह पूजा करण्यात येते. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
गायीत श्रीकृष्णाचे वास्तव अशी असते श्रद्धा-
वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. वसूबारस साजरी करण्यामागे अजून माहिती अशी सांगितली जाते की, दिवाळीच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. गाय देखील कृष्ण स्वरूपात प्रभू प्रतिनिधित्व करते आणि म्हणून या दिवशी उपासना केली जाते, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे.
आजपासून दिपावलीला सुरुवात
भारतीय स्वदेशी गोवंशाच्या वृद्धीसाठी या दिवशी गावा-गावात शेतकरी गाय-वासराचे पूजन करतात. गुरुवारी वसूबारस निमित्त गाय व वासरूचे पूजन करून दीपावली सणाला सुरुवात झाली आहे.