नांदेड - सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामे वेळच्यावेळी पूर्ण व्हावीत, यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष असले पाहिजे. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय विभागातील काही अधिकारी, कर्मचारी आपल्या कार्यालयात अथवा मुख्यालयी हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जे कर्मचारी, अधिकारी शासकीय कामात टाळाटाळ करीत आहेत अथवा कार्यालय सोडून बाहेर थांबतात, अशांविरुद्ध शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आहेत.
विनापरवानगी गैरहजर राहिल्यास निलंबनाची कारवाई !
सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या व मुख्यालयी न थांबणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासन परिपत्रक क्रमांक सिडीआर-1300/प्र.क्र.9/00/11 दिनांक 17 ऑगस्ट 2000 अन्वये शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जे अधिकारी, कर्मचारी विनापरवानगीने कार्यालयात गैरहजर राहिल्यास अथवा विनाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही करण्याची तरतूद केली आहे.
आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी
याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम 1979 मध्ये प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांने नेहमीच कर्तव्य परायनता ठेवावी आणि शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल अशा कोणत्याही गोष्टी करता कामा नयेत, असा स्पष्ट उल्लेख करून प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीवही करून दिली आहे.
...तर घरभाडे भत्ता कपात करू
शासनाच्या या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित राहून शासकीय, नागरिकांची कामे पार पाडावीत, असे स्पष्ट करून गैरहजर अथवा कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना देय असलेला घरभाडे भत्ता कपात करण्याची कार्यवाही करून संबंधित विभाग प्रमुख यांनी त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी, असे निर्देशीत केले आहे. याचबरोबर सर्व संबंधीत विभाग प्रमुखांनी शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांचे व शासनाचे कामे वेळेत होण्यासाठी जिओफेंस्ड अटेंडन्स सिस्टम कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.