नांदेड - संचारबंदीच्या भीतीने कोणी वाहनधारक रुग्ण नेण्यास तयार नसल्याने एका डायलेसिसवरील रुग्णाला चक्क ८० किलोमीटर बैलगाडीतून दाखल करण्यात आले आहे.
उमरी तालुक्यातील पळसगाव येथील रोहिदास भीमराव पवळे हे वृद्ध सध्या डायलेसिसवर आहेत. त्यांना आठवड्यातून दोन वेळा रक्त बदलावे लागते़. त्यांना गावाकडून रेल्वे अथवा खासगी वाहनाने शहरात आणण्यात येत होते. मात्र, २३ मार्चच्या मध्यरात्री संचारबंदी लागू करण्यात आली; आणि या रूग्णांच्या नातेवाईकांनी धास्ती घेतली. लॉकडाऊनमुळे सर्वच वाहने बंद असल्याने रूग्णालयात पोहोचायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला. कोरोना विषाणूसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी लागू केल्याने नांदेडला येण्यास वाहनाची व्यवस्था होत नव्हती. त्यामुळे भयभीत झालेल्या पवळे कुटुंबीयांनी रूग्णाला बैलगाडीतून शहरात नेण्याचे ठरवले. रात्री दोन वाजता पळसगावातून बैलगाडी निघाली. तब्बल ऐंशी किलोमीटरचा हा प्रवास करून ते मंगळवारी (२४मार्च) सकाळी १० वाजता शहरात पोहोचले. त्यांच्यावर उपचार करून रक्त चढवण्यात आले.
दरम्यान, कोरोनाला लढा देताना जुन्या रूग्णांना रूग्णसेवा, वेळेवर औषधे, रूग्णवाहिका, सरकारी १०८ गाडी वेळवर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी अतिरिक्त रूग्णवाहिका १०८ गाड्यांची तयारी प्रशासनाने करणे आवश्यक आहे.