नांदेड - कॅनडामध्ये जाण्यासाठी 'ऑनलाइन इंटरनॅशनल फ्लाईट मेक ट्रीप ' या ऑनलाइन संकेतस्थळावर संपर्क साधून बँक खात्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या खात्यातून पन्नास हजार रुपये परस्पर लंपास केल्याची घटना गुरुद्वारा जवळ घडली आहे. याप्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात संशयित कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरमितसिंग कुलदीपसिंग गिल यांनी कॅनडाला जाण्यासाठी गुगलवर 'इंटरनॅशनल फ्लाईट मेक ट्रीप' संकेतस्थळावर सर्च केले. यावेळी त्यांना ग्राहक क्रमांक मिळाला. संबंधित क्रमांकावर चौकशी केल्यानंतर वेबसाईटवर आपले बँक खाते क्रमांक कळवावे, असे सांगण्यात आले. तसेच खाते क्रमांक दिल्यानंतर आपण याच संकेतस्थळावर तपासून पाहिल्यास जमा झालेली रक्कम परत मिळण्यासंबंधी आश्वासन देण्यात आले. तसेच प्रवास तिकीट रद्द केल्यास रक्कम कमी होणार नाही असे सांगितल्याने गिल यांनी स्वत:चा खाते क्रमांक दिला.
यानंतर रक्कम तपासल्यानंतर खात्यातून ४९ हजार ९९९ रुपये काढल्याचा मोबाईलवर संदेश आला. पैसे तर कपात झाले. मात्र तिकीट आले नसल्याने त्यांनी या क्रमांकावर अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्रमांक संपर्काच्या बाहेर होता.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गिल यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संदिप शिवले पुढील तपास करत आहेत.