नांदेड - अबचलनगर येथील ५६ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याचा स्वॅब पाठवला असता कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नांदेडमधील चौथा मृत्यू असून बुधवारी रात्री साडे सातपर्यंत ३२ पैकी २३ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील २२ अहवाल निगेटिव्ह तर एक पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेडमध्ये दिलासादायक वातावरण असताना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
शासकीय रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी 6 मे रोजी 32 अहवाल प्रलंबित होते. मात्र, रात्री साडे सातच्या अहवालानुसार 23 अहवाल प्राप्त झाले असून पैकी 22 संशयित व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. नांदेड शहरातील अबचलनगर येथील रहिवासी 56 वर्षीय पुरुष रुग्णाचा अहवाल हा पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. या रुग्णास एन. आर. आय. यात्री निवास येथे दि. 03 मे पासून अलगीकरण कक्षात दाखल करून त्यादिवशीच स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्या अहवालाचा निष्कर्ष निघाला नव्हता.
या व्यक्तीची आज सकाळी नऊच्या सुमारास तब्येत बिघडून तो गंभीर स्थितीत गेला. त्यांना नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्वोपचार करूनही संबंधित रुग्णाकडून औषधोपचारास योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर या रुग्णास तत्काळ डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे पुढील उपचारासाठी पाठविण्याचे ठरले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला.
या रुग्णांला अतिउच्च रक्तदाब तसेच हृदयरोगाचा त्रास असल्याचे निदर्शनास आलेले आहे. रुग्णाचा आज सकाळी पुन्हा एकदा स्वॅब तपासणीसाठी घेतला असता त्याचा अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे. आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून इतर रुग्णांवर केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.