नांदेड - लोहा तालुक्यातील धानोरा (म) येथील दोघे नदीला आलेल्या पुरात रविवारी वाहून गेले होते. एसडीआरएफच्या पथकाला तब्बल ४१ तासानंतर हे दोन्ही मृतदेह शोधण्यात यश आले आहे. हे मृतदेह १४ किमी अंतरावर पांगरी शिवारात सापडले.
रविवारी झालेल्या प्रचंड पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. त्याचवेळी तालुक्यातील धानोरा (म) गावाजवळील नदीवरील पुलावरून जोरात पाणी वाहत होते. धानोरा (म) येथील बंडू बोंढारे व जयराम भुजबळ हे लोह्याकडून धानोराकडे रात्री दुचाकीने जात होते. पुलावरील पाण्यात गाडी चालवण्याचे धाडस केल्याने त्यांच्या जीवावर बेतले. पुराच्या पाण्यात दोघेही वाहून गेले. सोमवारी मनपाच्या जीवरक्षक दलाने शोध घेतला. परंतु शोध लागला नसल्यामुळे एसडीआरएफला पाचारण केले होते.
हेही वाचा- नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात दोन दुचाकीस्वार पूरात वाहून गेले
मंगळवारी सकाळपासून एसडीआरएफ पथकाद्वारे शोध कार्य हाती घेण्यात आले. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास जयराम भुजबळ यांचा मृतदेह घटनास्थळापासून १४ किमी अंतरावर तर बंडू बोंडारे यांचा मृतदेह दुपारी ३ च्या सुमारास १८ किमी अंतरावरील पांगरी शिवारात आढळून आला. ४१ तास या पथकाने केलेल्या प्रयत्नानंतर हे मृतदेह सापडले.
हेही वाचा- पैनगंगा नदीला आलेल्या पुरात युवक बेपत्ता
मदतकार्यासाठी एसडीआरएफ पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे यांच्यासह दलाचे २३ कर्मचारी, लोह्याचे पोलीस निरीक्षक बी.एम. मोहिते, मोकले, मारोती सोनकांबळे, पोलीस हेड कॉन्सटेबल वसंत केंद्रे, बलवान कांबळे, मारोती पाटील आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा- उकळत्या तेलात हात बुडवलेल्या दोघांना मुंबईला हलवणार; नांदेड जिल्ह्यातील प्रकार