नांदेड - अर्धापूर तालुक्यातील शेणी येथील शेतकरी सुरेश धात्रक यांच्या शेतात रविवारी (दि.८ मार्च) रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून चार ते पाच फूट उंच वाढलेली अडीचशे ते तीनशे केळीची झाडे कापून टाकली. तसेच याच गावातील शेतकरी रामराव पन्नासे टरबूजांची (कलिंगड) कोयत्याने नासधूस करून रोडवर एक दोन टन टरबूज रस्त्यावर फेकून दिले. यात दोन्ही शेतकऱ्यांचे मिळून अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक वृत्त असे, शेणी (ता.अर्धापूर) येथील शेतकरी सुरेश धात्रक यांची तालुक्यातीलच देळूब शिवारात शेती आहे. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी एक हजार सातशे केळीची लागवड केली आहे. एक महिन्यांपूर्वी त्यांच्या शेतात येऊन काही अज्ञात इसमानी येऊन शंभर ते दीडशे केळीची झाडे कापून टाकली होती. याकडे त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केले होते. पण रविवारी (दि.८ मार्च) पुन्हा त्यांच्या शेतातील अडीचशे ते तीनशे केळीची झाडे कापून टाकली आहेत. सद्यपरिस्थितीत त्यांचे दीड ते दोन लाखांचे नुकसान असून झाडे कापल्यामुळे उर्वरीत केळीच्या बागेलाही उन्हाचा तडाखा बसणार आहे. यामुळे त्यांचा उत्पन्नावर परीणाम होणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
धात्रक यांच्या शेतापासून एक किलोमीटर अंतरावर शेणी गावातीलच रामराव पन्नासे यांचेही शेत असून त्यांनी दीड एकर टरबुजाची म्हणजेच कलिंगडाची लागवड केली आहे. अज्ञात व्यक्तीनी टरबूजाच्या शेतातही कोयत्याने टरबुजाची मोठी नासधूस करून टरबूज देळूब रस्त्यावर फेकून दिले. यात तीस ते चाळीस हजार रुपये नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार एस.आय.पवार हे करत आहेत.
हेही वाचा - रेल्वेत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना रेल्वे पोलिसांनी केले अटक