नांदेड - पीकविमा केंद्रचालकाकडून एकदरा परिसरातील १८ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची घटना घडली. शहरातील पीकविमा केंद्रचालकाने या १८ शेतकऱ्यांकडून पीकविम्यापोटी १८ हजार ६७५ रुपये घेवून त्यांची फसवणूक केली. यात विमा न भरल्यामुळे शेतकऱ्यांचे ८ लाख ८८ रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी पीकविमा केंद्रचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शासनाच्या वतीने खरीप हंगाम २०२० साठी शेतकऱ्यांना पीकविमा योजना लागू केली. पीकविम्यासाठी एकदरा परिसरातील १८ शेतकऱ्यांनी पीरबुहाण येथे असलेल्या रुबी डिजीटल सेवा केंद्र चालक सय्यद मुक्रम अली याच्याकडे पीकविमा मिळण्यासाठी १८ हजार ६७५ रुपयांचा हप्ता जमा केला. यावेळी केंद्र चालकाने पीकविमा भरल्याचे भासवून बनावट कागदपत्र शेतकऱ्यांच्या हातात सोपवली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविमासाठी बँकेत जावून चौकशी केली असता, मंजूर झालेल्या पीकविमा योजनेच्या यादीत शेतकऱ्यांची नावे नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची शंका शेतकऱ्यांना आल्यानंतर त्यांनी सीएससीचे जिल्हा समन्वयक यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संयुक्त पथकातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक तपासणीक व जिल्हा समन्वयक संबंधीत केंद्रावर गेले असता, केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर अधिक चौकशी केली असता, केंद्रचालक सय्यद मुक्रम अली याने शेतकऱ्यांकडून पीकविमा हप्त्यापोटी १८ हजार ६७५ रुपयांचा अपहार करून शेतकऱ्यांची विमा संरक्षीत रक्कम ८ लाख ८८ हजार ८५० रुपयांचे नुकसान केल्याचे आढळले. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.