नांदेड - जिल्ह्यातील उमरी (ता. अर्धापूर) येथून मोटारसायकलने मालेगावकडे येत असताना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर पती, पत्नी व मुलगा यांना रस्त्यावर अडवून अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला असून त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर मुलगा या हल्ल्यातून बचावला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहीती अशी, उमरी येथून कामे आटोपून साडे सात वाजताच्या सुमारास मोटरसायकलवरून मालेगावकडे येत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी छाया रावसाहेब पांचाळ, रावसाहेब पांचाळ व त्यांचा मुलगा यांच्यावर मालेगाव-अर्धापूर रस्त्यावरील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गाडी पुढे येऊन धारदार शस्त्राने हल्ला केला. यात छाया रावसाहेब पांचाळ (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला तर रावसाहेब पांचाळ (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. मुलगा सत्यम रावसाहेब पांचाळ (वय ११) मात्र बालबाल बचावला आहे.
पोलिसांनी तातडीने रावसाहेब पांचाळ यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवशे, जमादार परमेश्वर कदम, हेमंत देशपांडे, शेख मजाज खान यांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यासाठी मदत केली. दरम्यान हा हल्ला नेमका कशातून झाला हे स्पष्ट झाले नाही.