नांदेड: स्थानिक निवडणुकांची तयारी सुरू असल्याने आपण नागपुरच्या सभेला जाणार नाही, असे स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले आहे. याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळवल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या सभेत प्रत्येक पक्षाच्या दोन वक्त्यांनी भाषण करण्याचे ठरले. मी आणि बाळासाहेब थोरात संभाजीनगरच्या सभेत बोललो. यावेळी दुसऱ्या नेत्याला संधी मिळावी, तसेच नांदेडला बाजार समित्यांची निवडणुक असल्याने आपल्याला थांबणे भाग होते. म्हणुन वज्रमूठ सभेला गेलो नाही, असे देखील अशोक चव्हाण म्हणाले.
महाविकास आघाडीत सर्व काही व्यवस्थित: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपामध्ये जाण्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र काही तरी बातम्या येत असतात. महाविकास आघाडीत सर्व काही व्यवस्थित असल्याचे काँगेस नेते अशोक चव्हाण म्हणाले. आमदार अपात्र ठरले तरी सरकार स्थिर राहाणार, असे अजित पवार म्हणाले. या विषयी अशोक चव्हाण यांना विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर परिस्तिथी स्पष्ट होईल असे चव्हाण म्हणाले. महाविकास आघाडी भक्कम असल्याचे देखील अशोक चव्हाण म्हणाले.
सभेला गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण: अशोक चव्हाण हे बहुमत चाचणीच्या वेळी सभागृहात उशिरा पोहोचले होते. त्यामुळे ते मतदान करू शकले नव्हते. त्यांच्यासोबत इतर 4 ते 5 आमदार बहुमत चाचणीपासून दूर राहिले होते. आमच्या पाठीशी असणाऱ्या अदृश्य हातांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आभार मानले होते. त्यातच आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे महाविकास आघाडीच्या नागपूर येथील वज्रमुठ सभेला गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा अशोक चव्हाण हे चर्चेचा विषय झाला आहे अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सोशल मीडियावर एक ट्रेड चालू झाला आहे. तसेच नागपुरातील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, राज्य सरकार, तसेच पीएम मोदी यांच्यावर तोफ डागली आहे.