नांदेड : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. भाजपच्या सुभाष साबणेंचा त्यांनी 41933 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेस-भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
- जितेश अंतापूरकर (काँग्रेस)- 1,08,789
- सुभाष साबणे (भाजपा) - 66,872
- डॉ. उत्तम इंगोले (वंबआ) - 11,347
- विवेक सोनकांबळे - 465
- नोटा - 1103
देगलूर पोटनिवडणूकीसाठी शनिवारी मतदान पार पडले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६०.९२ टक्के मतदान झाले. निवडणुकीत ९४२२७ पुरुष मतदार तर ८७५२३ स्त्री मतदार असे एकूण १लाख ८१ हजार ७५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. काँग्रेस आणि भाजपसाठीही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. या पोटनिवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती व्हावी यासाठी भाजपाने आपला पूर्ण जोर लावला होता. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, केंद्रीयमंत्री भागवत खुबा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. तर काँग्रेसचा गड म्हणणाऱ्या महाविकास आघाडीकडून विजय वडेट्टीवार, मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले, धनंजय मुंडे, नीलम गोऱ्हे यांच्या सभांच्या तोफा धडकल्या होत्या. आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघ पोटनिवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेस, भाजपा व वंचित आघाडी अशी तिहेरी झाली होती.